विटाळ
स्वयपाकाला लावलेली बाई...
म्हणाली....तुमची पाळी आली की मला सांगत जा ताई!
मी म्हटलं का ग?? तर म्हणाली....मला हाथ बोट नाही चालत...घरी जाऊन अंघोळ करून देवपूजा करत जाईल ना मग......मी म्हटलं बरं
मग तुझ्या पाळी ची तारीख काय ग ? ती दचकली जरा...
अअअ... उउऊ... चा तिचा सूर निघताच मी म्हटलं...अग तुझी पाळी आली की पाच दिवस तू पण नको येऊस... त्या पाच दिवसाचे पैसे कापून पगार घेत जा महिन्याचा!
आता मात्र तिची बोबडीच वळलेली.....
नाही ताई तुम्हाला तर चालत ना...ती बोलली
कसं काय ओळखलं तू आम्हाला चालते ते....
तुम्ही ते एस.सी.लोक ना...तुम्हाला चालत सर्व,तुम्ही देव नाही पूजत न....
अच्छा...म्हणून आम्हाला चालते....छान!
तुला त्या पाच दिवसाने माझा विटाळ मग मला तुझा का नको!हो ना विटाळ च म्हणतेस ना...हो(एकदम आत्मविश्वासाने बोलली ती)
अस कर आपण दोघी पण महिन्याचे दहा दिवस पाळूया, तू तुझ्या पाळीत पाच दिवस येऊस नको,आणि मी माझ्या पाळीचे पाच दिवस तुला येऊ देणार नाही! जमलं न आता उरले वीस दिवस एवढाच पगार तू घेत जा,,बरोबर न!आता मात्र थोड्या चिडक्या स्वरात बोलली काय ताई अस कुठे असत का?पगार तर पूर्णच घेणार न....
मग तुला पगार पूर्ण हवाय, काम पण पूर्ण दिवस करायचंय मग या सर्व गोष्टींचा माझ्या पाळीशी काय संबंध?
आज प्रत्येक स्त्री कुठल्या ना कुठल्या कामाकरिता बाहेर पडतेय मग ती प्रत्येक स्त्रीची पाळी आली आहे का? हे विचारत फिरत नाही.कारण आज काम महत्त्वाचे असते विटाळ नाही...आणि आपण सर्व स्त्रिया आपणच आपापल्या पाळीचा विटाळ मानत बसलो तर परिवर्तन ,बदल होणार कधी?हे पूर्वापार चालत आलेले अत्यन्त बुरसटलेले विचार आहे जे कुणी देवाने सांगितलेले नाही.आपण मनुष्यानेच मुख्यतः स्त्रीनेच स्वतःला हे अपवित्र आहे म्हणून यात स्वतःला बांधून ठेवलेले आहे देवाच्या नावाखाली!
कितीही समजावून माझी बाई नाही मानली शेवटी मी म्हटलं ठीक आहे तू नको करू माझ्याकडे काम जर तुला विटाळ होत असेल तर,पण मी माझी पाळी कधी येणार हे तुला का म्हणून सांगू....उलट तू एक स्त्री म्हणून मला जर असे विचारले असते की ताई तुमची पाळी जेव्हा येईल तेव्हा मी एखादे जास्तीचे काम करून देईल तुम्ही आराम कराल,,,तेव्हा तुझ्या पाळी चा मी ही विचार केला असता की नको येऊस त्या दिवसात...हे आपुलकीच नात असत पाळी च्या काळातल....ना की तू मला विटाळ मानून अंघोळ करशील घरी जाऊन,जर मी सोहळी आहे,एस.सी.जातीची आहे तर तुला माझ्याकडे काम करणं पण कस जमत मग!हुश्श......बास झालं आता सोडा हे सर्व!
एवढी स्त्री,समाज, देश प्रगत झाला म्हणायचा,खूप शिक्षित व्हायचं आणि देवाच्या नावाखाली हे थोतांड करायचे,आपल्याच योनीमार्गातून निघणारे निरर्थक रक्ताचा विटाळ मानणाऱ्या स्त्रियांनो सुधारणा करा आतातरी स्वतःच्याच विचारसरणीत...आणि या पाळीच्या दिवसात तुम्ही कुठेही गेलात तरी काहीच होत नाही,मंदिरात,दवाखान्यात,बाजारात,घरात स्वतंत्र वावरा...आणि हो जर एस.सी.जातीच्या स्त्रिया हे सर्व पाळत नाहीत असा समज ज्यांना आहे त्यांनी मग त्यातून एक धडा घेण्याची गरज आहे की जर ह्या कुठेही गेल्या तरी त्यांना काहीच होत नाही आणि कधी झालेलं नाही मग आपणही त्यांच्या सारखेच हाडा मांसाचे आहोत आपनच का अस भूत भरवून घ्यायचं डोक्यात....
गरज आहे परिवर्तनाची,स्वतःकडे अभिमानानं,स्वाभिमानाने बघायची...आणि हे आपणच घडवून आणू शकतो फक्त मत परिवर्तीत करणे व त्या विचारांचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
"मीच माझा अभिमान"
एवढाच बदल अपेक्षित आहे.कुठल्याही परिस्थितीत स्वतःकडे कधीच हीन भावनेने बघू नका....मी सुंदर,सक्षम,स्वाभिमानी हे तीन शब्द आपले ब्रीद बनवा!
(उपरोक्त लेख संपूर्ण महिला वर्गास समर्पित)
हर्षा मोडक
नागपूर
(लिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे अबाधित आहेत कृपया कॉपी पेस्ट करून दुखवू नये धन्यवाद)