"होय, आम्ही 'शूद्र' आहोत !!"
'हिंदी पट्ट्यातून ओबीसींचा एकमुखी आवाज !'
चातुर्वर्ण्यातील 'शूद्र' आपणच असल्याची स्पष्ट जाण ओबीसींना आलीय. हीच जाण, हिंदी पट्ट्यात राजकारणात उतरलीय. हिंदुत्वाच्या ध्रुवीकरणाला हा काटशह म्हणता येईल. संघ-भाजपची झोप उडालीय. 'शूद्र' राजकारणाने यूपी-बिहार ढवळून निघाले आहे.
कुठून आलं हे 'शूद्र' असे झालेय. राजकीय हवा गरम आहे. धर्म मैदानावर (पीच) असे होईल वाटले नव्हते. आपले मैदान असतांना धक्का ? धक्का मोठा आहे. सरसंघचालक हबकून गेले. जातींना ईश्वराने नव्हे, पंडितांनी (ब्राह्मणांनी) निर्माण केल्याचे बोलून गेले. जाणीवपूर्वक बोलले असतील तरी अडकले ! आता संघाचे अ.भार. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, इंडियन एक्सप्रेस ला स्पष्ट करताना म्हणाले, सरसंघचालक मराठीत बोलले. मराठीत पंडितचा अर्थ होतो 'बुध्दिवादी !'
निमित्त, तुलसीदासकृत रामचरित मानस मधील, "ढोल, गंवार, शूद्र, पशू, नारी .. सब है ताडन के अधिकारी" चौपाई (पद) आहे. ताडन म्हणजे शीक्षा-दंड !
बिहारचे शिक्षा मंत्री चंद्रशेखर राय यांनी ही बाब उचलली. सपा नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी उत्तरप्रदेशात पोचती केली. आता दोन्ही राज्ये यात लपेटली आहेत. विशेष म्हणजे दोघांनाही त्यांच्या पक्षप्रमुखांनी (तेजस्वी यादव- अखिलेश यादव) अभय दिले. तेजस्वी आधीच खुलून बोलत होते. आता अखिलेश खुलले. स्वामीप्रसादांची पदोन्नती झाली. राष्ट्रीय सरचिटणीस झाले. शिवाय यूपी ओबीसी जनगणना आंदोलनाचे नेते घोषित करण्यात आले. बिहारात ओबीसी जनगणना सुरू झालीय.
अलीकडे, सपाने लखनौ मुख्यालयासमोर भलेमोठे 'होल्डिंग' लावले. लिहिले आहे, "गर्व से कहो हम 'शूद्र' है !". अखिलेश यादव यांनी, 'हां, हम शूद्र है' असे पत्रकारांना सांगून टाकले. परत त्यांनी मुख्यमंत्री योगी यांना विचारले की, आपण पीठाधीश आहात. म्हणून 'त्या' चौपाईचा अर्थ सांगावा. योगी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत देतांना म्हणाले, त्या चौपाईचा अर्थ त्यांना कळणार नाही. ते 'नासमज' आहेत.
दोन्ही, टीव्ही व मोबाईल मिडियात यावर सडकून चर्चा आहे. काही म्हणतात, पंडित म्हणजे ज्ञाता-जाणकार. काही म्हणतात, चौपाईत शूद्र नव्हे 'क्षुद्र' लिहिले होते. काही म्हणतात, एकच चौपाई कां, अनेक चौपाईत आक्षेपार्ह लिहिले आहे. वाद मिटण्याचे नाव घेत नाही. आता तर तुलसी किंवा तुलसीदास न म्हणता, तुलसीदास दुबे म्हणतात. भरीसभर, ओबीसींची ठिकठिकाणी संम्मेलने होऊन आक्रमक भाषणे केली जात आहेत.
यात अडचण संघ-भाजपची झालीय. चौपाई विचारणाऱ्यांवर शंका घेता येत नाही. ते सारे हिंदू आहेत. पाकिस्तानात जा असे सांगता येत नाही. राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही ठरविता येत नाही. अशी अडचण झालीय. सपा-आरजेडी मात्र खुष आहे. ओबीसी गोलबंद होतोय. आक्रमक होतोय. स्वतः अखिलेश व तेजस्वी हे ओबीसी आहेतच. हिंदुत्वाची मोठी व्होट बॅंक सरकलीय. राजकीय चिडचिडीला उधाण आले आहे.
बसपा मूक आहे. पाहते आहे. तशीही आधीसारखी पकड नाही. कदाचित 'ती' व्होट बँक चौपाईकडे जाण्याची शक्यता बळावलीय. यूपीतील दलित अधिक जागे आहेत. मुस्लिमांना भाजप नकोच. धर्माचे राजकारण असा फेर धरेल हे संघ, भाजपला वाटले नव्हते. त्यांची चिडचिड मोठी आहे.
संविधानस्वीकृत देशधोरणे यातून बचावतील म्हणतात. काय व्हायचे ते पूढे अधिक स्पष्ट होईल. २४ चा फेर मात्र २३ ने आताच धरलाय. मध्यप्रदेशही घुसळते आहे. काट्याने काटा काढतात असे झाले की काय ?
वैचारिकी मात्र खिन्न आहे !
लेखक : रणजित मेश्राम