बहुमत सुद्धा चुकीचे असू शकतात.
समूहात बहुमताने घेतलेले निर्णय सुद्धा चुकीचे असू शकतात. प्रत्येकवेळी बहुमत हे योग्यच असते असे नाही. एखाद्या निर्णयावर बहुमत देण्यासाठी उपस्थित सदस्यांमध्ये (प्रज्ञा - व्यावहारिक शहाणपण) असतेच असे नाही. अपेक्षित उपाय न देणारे बहुमत नेहमीच संख्यात्मक प्रभाव पाडत असते. बहुमताने घेतलेले निर्णय हे विनाशाचेही कारण ठरू शकते.
रोहीणी नदीचे पाणी आधी कुणी घ्यावे म्हणून शाक्य आणि कोलीय यांच्यात नेहमी वाद होत असे. हा वाद शाब्दीक तर कधी हिंसक असे. रोहीणी नदीच्या पाण्याचा विवादीत प्रश्न नेहमीसाठी निकाली काढण्यासाठी शाक्यांच्या संथागाराच्या सेनापतीने युद्धाचा प्रस्ताव सभेसमोर मांडला. मात्र सिद्धार्थ गौतमाने प्रस्तावास विरोध केला. पाण्यासाठी कोलियांशी युद्ध करुन रक्तपात करणे टाळावे, असे सिद्धार्थाला वाटत होते. संथागाराने शाक्य आणि कोलीय यांच्यात एक समन्वय बैठक घेउन पाण्याचा प्रश्न चर्चेने सोडवावा असे सिद्धार्थने सुचविले. रक्तरंजीत युद्धाला सिद्धार्थाने विरोध दर्शविला. पण संथागाराच्या सेनापतीने बहुमताच्या आधारावर युद्धाचा प्रस्ताव मान्य करुन घेतला. संथागाराने युद्ध करण्याचे जरी बहुमत दिले तरी एकटा सिद्धार्थ मात्र आपल्या मतावर कायम राहीला. कारण त्याच्या एकट्याची एखाद्या निर्णयाप्रतीची प्रज्ञा ही संघगारातील बहुमत असलेल्या सर्व सदस्यांपेक्षा जास्त होती. युद्ध प्रस्तावाला विरोध केला म्हणून संघाचे नियम तोडल्याबद्दल संथागाराने सिद्धार्थाला देशत्याग शिक्षा सुनावली. संघाच्या शिस्त आणि नियमासमोर ती शिक्षा त्याने मान्यही केली. कारण संघाचा तो एक शिस्तप्रिय बाणेदार सदस्य होता.
पण सिद्धार्थ बरोबर होता. एकट्या सिद्धार्थाने विरोध केला असला तरी संघाने मात्र बहुमताच्या आड निर्णय पारीत करुन घेतला होता. पण संघाचा बहुमताचा निर्णय चुकला होता. कारण सिद्धार्थाला शिक्षा झाल्यानंतर काही दिवसांनी कोलियांशी युद्ध न करता रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न अगदी सिद्धार्थाने सांगितल्याप्रमानेच चर्चेने सोडविन्यात आला होता. सिद्धार्थाने म्हटल्याप्रमाणे पाण्यासाठी युद्धाची गरज पडली नाही.
सिद्धार्थ बरोबर असतांनाही मात्र संथागाराच्या चुकीच्या बहुमताची शिक्षा सिद्धार्थाला नाहक भोगावी लागली. संघाने शिक्षा देन्याप्रत तो दोषी नव्हता. संघातील सदस्यांत त्याच्या प्रज्ञेची बरोबरी कुणातही नव्हती. सिद्धार्थाने जे म्हटले ते सर्वांच्या प्रज्ञेला एक आव्हान होते. हे आव्हान पेलण्याची कुवत संघातील इतर सदस्यात नव्हती. सिद्धार्थाला एकटे पाडून चुकीचा निर्णय घेणे हा दोष संघाच्या बहुमत सदस्यांचा होता.
पाण्याचा प्रश्न युद्ध न करता चर्चेने सुटल्यामुळे संघाने सिद्धार्थाला माफी मागून परत बोलविले. पण तो परत आला नाही. आता तो नुसत्या रोहीणी नदीच्या पाण्याच्या प्रश्नाच्या नव्हे तर जगातील अतीव दु:खाच्या प्रश्नांच्या उत्तराकडे तो मार्गस्त झाला होता.
सिद्धार्थाने देशत्याग केल्यावर सहा वर्षाने धम्माचा आविष्कार केला. तो आता सिद्धार्थ नाही तर बुद्ध झाला होता. मानवी कल्याणाचा त्याचा हा धम्म जगात प्रस्तावीत करण्यासाठी त्याला त्याचे विचार समजून घेणाऱ्याची आवश्यकता वाटली. त्याच्या धम्माच्या प्रचारासाठी त्याला शिस्तबद्धच नव्हे तर प्रज्ञावंत संघाची गरज होती.
सिद्धार्थाने त्याच्या तारुण्यात ज्या शिस्तबद्ध संघागारात वयाची वीस ते एकोणतीस वर्षे घालवीली होती. ज्या संघाचा तो स्वत: एक बाणेदार सदस्य होता त्या शिस्तबद्ध संघाची मात्र त्याने त्याच्या धम्माच्या प्रचार प्रसारासाठी विचार केला नाही. कदाचीत संथागारातील संघ जरी शिस्तबद्ध असला तरी बुद्धाच्या वैश्विक धम्माला समजन्याची कदाचीत त्या संघाची कुवत नसावी. कारण जिथे सिद्धार्थाच्या नुसत्या पाण्याच्या निर्णायक मताला संघातील सदस्य समजू शकले नाहीत तिथे बुद्धाचे विचार समजन्याची प्रज्ञा कदाचीत त्या संथागारात नसावी!
त्याने त्याच्या धम्माच्या प्रसारार्थ नव्या शिस्त आणि प्रज्ञावान संघाची स्थापना केली आणि जग बौद्धमय केले. आज बुद्धाला जाऊन अडीच हजार वर्ष झाले असले तरी त्याचा धम्म सतत शाश्वत आणि जीवंत आहे.
अगदी असेच एखाद्या संघटनेचेही असते. संघटनेला शिस्तच नाही तर प्रज्ञावान लोकांची गरज असते. प्रेम,आपुलकी,भावनेच्या आधारावर संघटना उभ्या राहत असेल तर अशा संघटनांचे अगदी अफाट महासागराच्या संथ पाण्यावर बुडबुडे निर्माण होतात आणि नष्ट होतात असे भविष्य असते.